११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती: ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत एक प्रचंड व्यापारी साम्राज्य उभारून समाजसुधारणेची भावना जागृत केली. ज्यावेळी टाटा बिर्ला हजारांत खेळत होते तेंव्हा महात्मा फुले लाखांत व्यवसाय करत असतांना समाजसुधारक कसे झाले हे जाणून घेऊया.
सामग्री सारणी
महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म आणि बालपण:
ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब माळी जातीचे होते. त्यांचे वडील गोविंदराव गोरे आणि आई चिमणाबाई गोरे यांचा व्यवसाय फुले आणि भाजीपाला विक्रीचा होता. शेवटच्या पेशव्यांच्या काळात ज्योतिराव यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना “फुले” हे आडनाव मिळाले. समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यतेचा सामना करत फुले कुटुंबाने जीवन जगले.
ज्योतिराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिराव ही शिक्षणाकडे आकर्षित झाले.
ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे शिक्षण:
ज्योतिरावांचे प्राथमिक शिक्षण १८३४-१८३८ दरम्यान झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर फुले यांना शाळा सोडावी लागली. त्याला मदत करण्यासाठी तो वडिलांसोबत शेतात काम करू लागला. ज्योतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना ‘सेंद्रिय बुद्धिवंत’ असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
अनेक अडचणी आल्या, तरी त्यांनी शालान्त परीक्षे इतके इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीरशिक्षणही घेतले. लहूजीबुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले, मल्लविद्या संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुण फुले यांनी ब्रिटिश राजवटीत काम करण्याऐवजी व्यवसाय करणे पसंत केले होते.
महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा कंत्राटदार झाले
फुले, फळे, भाजीपाला, गूळ अशा जीवनावश्यक वस्तू विकून त्यांनी व्यवसाय सुरू केला. इत्यादी व्यवसाय केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कंत्राटदार म्हणून काम करू लागले. फुले यांनी रामचंद्र शिंदे आणि कृष्णराव भालेकर यांच्यासमवेत “पूना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी” ची स्थापना केली. मोठमोठे दगड, चुना, विटा तोडून तो कृत्रिमरीत्या तयार केलेले खडे विकायचा.
लवकरच त्याला ब्रिटिश सरकारकडून कंत्राटे मिळू लागली. त्यांनी बांधकाम प्रकल्पांसाठी बांधकाम साहित्य आणि कारागीर पुरवण्यास सुरुवात केली. खडकवासला धरण, येरवडा पूल आणि सातारा बोगदा आदी बांधकामांसाठी फुले यांच्या कंपनीने साहित्य व कामगारही दिले होते. त्यांची एक एजन्सी देखील होती जी मुख्यतः कारखान्यांच्या वापरासाठी सोने, चांदी आणि तांब्याचे साचे विकत असे.
व्यवसायाच्या जोरावर ब्रिटिश सरकारमध्ये प्रभाव निर्माण केला. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर सर्व सदस्यांची नियुक्ती ब्रिटीश सरकारने केली. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते.
पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी अनेक भव्य आणि देखणी बांधकामे पूर्ण केली. यात कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा यांचा समावेश आहे.
बंडगार्डन आणि येरवड्याला जोडणारा मुळामुठेवरचा पूल 1867 साली बांधण्यात आला, त्याचे आयुष्य 100 वर्षांचे होते आणि 140 वर्षे वापरात होता. आजही तो भक्कमच आहे.
जोतीराव फुले यांच्या कंपनीचे भागीदार आणि सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. यात मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल, परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय आणि बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा यांचा समावेश आहे.
राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या होत्या.
जोतीरावांच्या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचे कामही केले जात होते. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी 1865 साली लिहिले. जोतीरावांनी ते “जातीभेद विवेकसार” नावाने प्रकाशित केले. या कंपनीचे पुण्यात पुस्तकविक्री केंद्रही होते.
सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची संपूर्ण मुंबई प्रांताची होलसेल एजन्सी जोतीरावांकडे होती.
१५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य
महात्मा ज्योतिबा फुले यांना जीवनातील शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा फुले त्यांच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद जवळून पाहिलेला असल्याने त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. पहिल्या दिवशी या शाळेत ८ मुली उपस्थित होत्या. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्यध्यापिका बनविले.
अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा घेतली होती. मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केल्यात. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस आत्या -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली.
३ जुलै १८५१ रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, तर १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली. यानंतर १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरु केली. १९ मे १८५२ रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. १८५२ साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पूना लायब्ररीची स्थापना केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर१८५३ मध्ये महार, मांग आदी लोकांना शिकविण्यासाठी ‘मंडळी’ नामक संस्था स्थापन केली. तर १९५५ मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली ‘रात्र शाळा’ त्यांनी स्थापन केली.
जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला.
१८८२ साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर महात्मा ज्योतिबा फुलेंनी साक्ष देऊन १२ वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा जोतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ होते.
शिक्षणासोबतच त्यांनी सामाजिक सुधारणा आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात लढा देण्यास सुरुवात केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य:
इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी मानवी हक्कावर लिहिलेले पुस्तक ‘The Right Of Man, Justice and Humanity, Common SenseThe Age of Reason’ त्यांच्या वाचनात आले. या पुस्तकाचा ज्योतिरावांच्या मनावर फार मोठा प्रभाव झाला. व त्यातूनच सामाजिक न्यायाबाबतचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते.
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या “शेतकऱ्याचा आसूड” या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतीरावांचे दर्शन होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड बरोबरच अनेक ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले.
‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे ज्योतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.
२८ जानेवारी १८६३ रोजी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना पुणे येथील आपल्या राहत्या घरी केली. यानंतर पंढरपुरातही अशाच गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंधगृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे १८७३ मध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला.
८ मार्च १८६४ रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला.
१८७७ साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळपीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच ‘व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची’ स्थापना केली.
यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. यशवंत व राधा यांचा हा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.
विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला.
- सत्यशोधक समाजाची स्थापना: जोतिबांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी लढा दिला.
- स्त्री शिक्षण: स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या समाजाच्या प्रथेला जोतिबांनी कडाडून विरोध केला. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले.
- शेतकऱ्यांचे प्रश्न: जोतिबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कार्य केले. कर्जमुक्ती, शेतकऱ्यांसाठी शिक्षण आणि न्यायासाठी त्यांनी लढा दिला.
- अंधश्रद्धा निर्मूलन: जोतिबांनी समाजातील अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरांवर प्रहार करून समाजाला प्रगतीशील विचारांकडे वळण्यास प्रवृत्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहित्यिक योगदान:
महात्मा फुले यांनी समाजसुधारणा, शिक्षण, स्त्री शिक्षण, शेतकरी आणि दलित हक्कांसाठी अनेक कार्ये केली. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील समाजामध्ये मोठे बदल घडून आले. १८९५ साली फुलेंनी वयाच्या२८ व्या वर्षी पुण्यात ‘तृतीय रत्न’ हे पहिले नाटक लिहिले. हे जोतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते. ज्योतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना मुंबईतील सभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतीराव फुले हे “महात्मा फुले” या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-
लेखनकाळ | साहित्य प्रकार | नाव |
इ.स.१८५५ | नाटक | तृतीय रत्न |
जून, इ.स. १८६९ | पोवाडा | छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा |
जून इ.स. १८६९ | पोवाडा | विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी |
इ.स.१८६९ | पुस्तक | ब्राह्मणांचे कसब |
इ.स.१८७३ | पुस्तक | गुलामगिरी |
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ | अहवाल | सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत |
मार्च २० इ.स. १८७७ | अहवाल | पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट |
एप्रिल १२ , इ.स. १८८९ | निबंध | पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ |
२४ मे इ.स. १८७७ | पत्रक | दुष्काळविषयक पत्रक |
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ | निवेदन | हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन |
१८ जुलै इ.स. १८८३ | पुस्तक | शेतकऱ्याचा असूड |
४ डिसेंबर इ.स. १८८४ | निबंध | महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत |
११ जून इ.स. १८८५ | पत्र | मराठी ग्रंथागार सभेस पत्र |
१३ जून इ.स. १८८५ | पुस्तक | सत्सार अंक १ |
ऑक्टोंबर इ.स. १८८५ | पुस्तक | सत्सार अंक २ |
१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ | पुस्तक | इशारा |
२९ मार्च इ.स.१८८६ | जाहीर प्रकटन | ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर |
२ जून इ.स. १८८६ | पत्र | मामा परमानंद यांस पत्र |
जून इ.स. १८८७ | पुस्तक | सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी |
इ.स. १८८७ | काव्यरचना | अखंडादी काव्य रचना |
१० जुलै इ.स. १८८७ | मृत्युपत्र | महात्मा फुले यांचे उईलपत्र |
इ.स. १८९१ (प्रकाशन) | पुस्तक | सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक |
महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू:
जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंचे मध्यरात्री २ वाजता पुणे येथे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आजही प्रासंगिक आहे.
आजही समाजामध्ये जातीभेद, अस्पृश्यता आणि लैंगिक भेदभाव सारख्या समस्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण या समस्यांवर मात करू शकतो.
संदर्भ:
- महात्मा फुले – विकिपीडिया
- ज्योतिबा फुले – मराठी विश्वकोश