आज, मार्च १० रोजी, समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. महाराष्ट्रासाठीचं नाही तर संपूर्ण भारतासाठी त्यांचं कार्य अविस्मरणीय आहे. आपल्या मुलींना शिक्षणाची संधी मिळते. समाजात महिलांचं स्थान बदलत आहे. यामागे सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांचं अतुलनीय योगदान आहे.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी नायगाव (जिल्हा सातारा, महाराष्ट्र) येथे झाला. वडील गावचे पाटील खंडोजी नेवसे पाटील तर आई लक्ष्मीबाई होत. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे कटगुणचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना “फुले” हे आडनाव मिळाले होते. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या घरीच शिक्षण देऊन त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्याकडे दिली होती.
महात्मा फुले हे ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा ही कामे महात्मा फुले यांच्या कंपनीने केली आहेत. महात्मा फुले यांच्या कंपनीचे भागिदार किंवा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेल्या व्यक्तिंनी बांधकाम क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे केली असल्याचे लेखक विचारवंत प्रा. हरी नरके यांनी त्यांच्या एका लेखात सांगितले. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची संपुर्ण मुंबई प्रांताची होलसेल एजन्सी जोतीरावांकडे होती. ज्या वेळेस टाटा बिर्ला यांचा टर्नओव्हर हजारांत होता त्यावेळी जोतिबांच्या कंपनीचा टर्नओव्हर लाखांत होता.
विचार करा पराकोटीचा जातीभेद असतांना एवढ्या मोठ्या उद्योजकाची पत्नी सनातनी उच्च वर्णीय, मनुवाद्यांविरोधात जातात. मागास वस्तीत मुलींसाठी शाळा सुरु करतात. त्या शाळेत स्वतः शिकविण्यासाठी जातात. लग्नानंतर त्यांनी आपले पती ज्योतिबा फुले यांच्या बरोबर समाजकार्यात उडी घेतली. त्यांनी भारतातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान मिळवला. १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. १८४८ साली त्यांनी पुण्यात मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. यामुळे त्यांना समाजाचा विरोध सामोरा येऊनही त्यांनी शिक्षणाचा प्रचार थांबवला नाही.
(सगुणाऊ: जोतीरावांची मावस आत्या, यांनीच आईविना पोरक्या जोतीरावांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला त्यातून जोतीराव घडत गेले.)
सावित्रीबाई नी स्वतःला दोन शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमातही सहभागी करून घेतले होते. पहिले अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेत होते, तर दुसरा अभ्यासक्रम पुण्यातील एका सामान्य शाळेत होता.
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. कर्मठ सनातन्यांनी विरोध केला, अंगावर शेणही फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत
सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाबरोबरच अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतही मोलाचे योगदान दिलं. त्यांनी सतीसारख्या कुप्रथांवर आवाज उठवला. स्त्री भ्रूणहत्या आणि बालविवाहासारख्या सामाजिक कुरीतींवर त्यांनी हल्लाबोल केला. त्यांचं हे कार्य इतकं प्रभावी ठरलं की, पुढील पिढीतील समाजसुधारकांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळाली.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखून त्यांनी काही क्रूर रूढींनाही आळा घालण्यासाठी कार्य केले. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या (जरठ म्हणजे प्रौढ किंवा वृद्ध पुरुष आणि कुमारी म्हणजे लहान मुलगी यांचा विवाह म्हणजे ‘जरठ-कुमारी विवाह’). ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत असे. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांचे योगदान
सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाच्या अग्रणी म्हटले जाते. त्यांच्या कार्यामुळे भारतातील स्त्री शिक्षणासाठी मोठे पाऊल उचलले गेले.
त्यांच्या योगदानाची काही ठळक उदाहरणे:
१. मुलींची पहिली शाळा:
- १८४८ साली पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली.
- सुरुवातीला समाजाचा विरोध झाला, पण त्यांनी हार मानली नाही.
- यानंतर अनेक शाळा स्थापन करून मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले.
२. शिक्षणासाठी प्रेरणा:
- घरोघरी जाऊन मुलींना शिक्षणासाठी प्रेरित केले.
- गरिब आणि अनाथ मुलींना शिक्षण देण्यासाठी मोफत वसतिगृहे स्थापन केली.
- शिक्षणामुळे स्त्रियांचे जीवन सुधारेल आणि समाजात त्यांचा दर्जा उंचावेल यावर विश्वास ठेवला.
३. सामाजिक कुप्रथांविरोधात लढा:
- बालविवाह आणि सतीसारख्या कुप्रथांवर आवाज उठवला.
- स्त्रियांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला.
- समाजात स्त्री-पुरुष समानता स्थापन करण्याचा प्रयत्न केला.
४. साहित्यिक योगदान: सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके
- स्त्रियांच्या शिक्षण आणि सामाजिक विषयांवर कविता आणि भाषणे लिहिली.
- काव्यफुले (काव्यसंग्रह)
- सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
- सुबोध रत्नाकर
- बावनकशी
- जोतिबांची भाषणे (संपादिका : सावित्रीबाई फुले १८५६)
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिणाम:
- स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
- स्त्रियांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात मोठे योगदान दिले.
- आज भारतात स्त्री शिक्षणाचा प्रसार होण्यामागे त्यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे.
सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आहेत. त्यांच्या कार्यामुळे भारतातील स्त्रियांच्या जीवनात मोठे बदल घडून आले आहेत. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. सावित्रीबाई फुले यांचा वारसा फार मोठा आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत महान मानले जाते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सोबतच सावित्रीबाई फुले या मागासवर्गीयांसाठी एक आयकॉन बनल्या आहेत. मानवी हक्क अभियान (मानवी हक्क अभियान, एक मांग – आंबेडकरी संस्था) च्या स्थानिक शाखांमधील महिला त्यांच्या जयंतीला अनेक मिरवणुका काढतात.
- पुणे महानगरपालिकेने १९८३ मध्ये त्यांचे स्मारक तयार केले.
- १० मार्च १९९८ रोजी फुले यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
- ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
- २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आहे.
आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. आपल्या मुलींना शिक्षणाची संधी मिळते. समाजात महिलांचं स्थान बदलत आहे. यामागे सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांचं अतुलनीय योगदान आहे. त्यांची पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्याचा आदरपूर्वक स्मरण करूया आणि समाजातील रूढ असलेल्या गैरसमजुतींवर मात करण्यासाठी प्रेरणा घेऊया.