अमित गोरखे: एसटी बस मध्ये पेपर, गोळ्या बिस्कीट विकणारं पोरगं ते विधानपरिषद आमदार

एका सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये दिनांक 4 नोव्हेंबर 1980 रोजी पुणे येथील मुंढवा येथे अमित गोरखे यांचा जन्म झाला. आई अनुराधा आणि वडिल गणपत गोरखे हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे जवळच्या लोणी व्यंकनाथ या मूळ गावचे होते. गणपत गोरखे त्याकाळी मुंढव्यातील भारत फोर्जमध्ये सिक्युरिटीचे काम करीत होते. अमोल आणि अश्विनी हे दोघे अमित गोरखे यांचे भाऊ-बहीण, आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.

गणपत गोरखे यांनी 1982 साली भारत फोर्जमधील नोकरी सोडून चिंचवडच्या रस्टन ग्रीव्हज कंपनीत वॉचमन म्हणून रुजू झाले. चिंचवडला एका पत्र्याच्या घरात स्थायिक झाल्यावर, अमित यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवड येथील शाळेत सुरु झाले.

1985 च्या दरम्यान संपूर्ण कुटूंब काळभोर नगरच्या एका चाळीमध्ये राहायला आले. 1988 मध्ये चाळीसमोरच एका निवासी संकुलाचे काम सुरू होते या ठिकाणी त्यांनी एक फ्लॅट बुक केला. गणपत गोरखे यांनी त्यासाठी काही मित्रांकडून, नातेवाईकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते फेडताना संसार चालवणे कठीण झाले आणि एक दिवस अचानकच ते घरातून निघून गेले. दीड वर्ष ते बेपत्ता होते. पदरात लहान मुले आणि त्यांचे शिक्षण, नातेवाईकांचा तगादा अशा परिस्थितीत त्यांच्या आईने कंबर कसली. मोठ्या धीराने येणाऱ्या प्रत्येक दिवसाशी झगडत, कष्ट करीत असतांना सुदैवाने त्यांना चिंचवडच्या मल्याळी समाजम् या संस्थेत बालवाडी शिक्षिका म्हणून काम मिळाले.

वडिलांच्या अशा अचानक गायब झाल्याने साऱ्या कुटुंबावर कुर्‍हाड कोसळलेल्या त्या दिवसात अमोल कच्ची दाबेली विकणे आणि अमित घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे तथा एसटी स्टँडवर काकडी विकण्याचे काम करू लागले. महिन्याकाठी 120 रुपये अमित ला मिळत असे. ९-१० वर्षाचा अमित गोरखे शाळा संभाळून काळभोर नगरच्या एसटी स्टँडवर काकडी विकत असे एसटीमध्ये प्रवाशांसमोर प्रत्येक प्रवाशासमोर उभा राहून गोळ्या बिस्किटे, काकडी शेंगदाणे आणि पाण्याच्या बाटल्या यांची विक्री करत असे. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आई-वडिलांना मदत करीत करीत शिक्षणही सुरू ठेवले होते.

शिक्षणाची सुरुवात आणि आव्हाने

चिंचवड येथील महानगरपालिकेच्या काळभोर नगरच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेत अमित यांचे चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण पार पडले. पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पिंपरी चिंचवड मनपाच्या माध्यमिक विद्यालयात झाले. त्यांच्या आईला शिक्षणाचे महत्व कळालेले असल्याने त्यांची इच्छा होती की त्यांनी पुण्यामध्ये कॉलेजमध्ये शिकायला जावे.

दरम्यानच्या काळात त्यांनी एका कंपनीत हेल्पर म्हणूनही काम केले. या कुटुंबाचा आधार जसा एक दिवस अचानक गायब झाला तसाच दीड वर्षाच्या कालावधीनंतर परत आला. आयुष्याच्या पौगंडावस्थेत सर्व सुखांना पोरका झालेल्या अमित गोरखे यांनी धावपळींना कंटाळून न जाता कष्टाचे डोंगर उपसले, यशाची एक एक पायरी चढत असतांना आईने मनात रुजवलेले उच्च शिक्षणाचे बीज जोपासत ठेवले होते.

उच्च शिक्षण आणि प्रारंभिक आव्हाने

त्यांच्या आईने त्यांना पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेऊन दिला, जिथे त्यांनी भूगोल विषय घेऊन बीए प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. बीए नंतर अमित गोरखे यांनी सिम्बॉयसिस लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी ला प्रवेश घेऊन एलएलबी ची दोन वर्षे पूर्ण ही केली, पण काही अडचणींमुळे तिसऱ्या वर्षाची परीक्षा देता आली नाही. तरीही त्यांनी सोशिओलॉजीतून एम. ए. केले आणि नंतर पुणे विद्यापीठातून एमबीए एच आर मध्ये डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण झाले.

शैक्षणिक संस्थेची स्थापना

शैक्षणिक आव्हानांना सामोरे जात वडिलांनी केलेली अपार मेहनत व आईचे संस्कार याच्या बळावर आपली स्वतःची शिक्षण संस्था असावी ही महत्त्वाकांक्षा ठेवून अमित गोरखे यांनी 2003 साली चिंचवड येथे दोन गाळे भाड्याने घेऊन कम्प्युटरचे क्लासेस सुरू केले. त्यांनी महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणही दिले.

काळभोर नगर चिंचवड येथील राष्ट्रतेज मंडळाच्या माध्यमातून त्यांनी जिवंत देखाव्याची संकल्पना प्रथमच लोकप्रिय केली. कलारंग या सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. 2002 मध्ये नोव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च शैक्षणिक ट्रस्टची स्थापना केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे 22 वर्षाचे होते.

नंतर काही वर्षांनी त्यांची आई अनुराधा गोरखे यांना अमित गोरखे यांच्या सामाजिक तथा शैक्षणिक सलोख्याच्या जोरावर व आईच्या कर्तुत्वावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी प्रभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. प्रभागाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, आईच्या बरोबरीने अमित गोरखेंनी शहराच्या विकासात योगदान दिले.

त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया गोरखे या आयुर्वेदिक डॉक्टर असून त्यांनी एमबीए करून हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये पीएचडी मिळवलेली आहे. नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन त्याच बघतात. त्यांचा भाऊ अमोल गोरखे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची वहिनी ह्या गृहिणी आहेत.

अमित गोरखे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2012 मध्ये केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, डी.एड., बीबीए, बीसीए इत्यादी अभ्यासक्रम सुरू करून शहराच्या शैक्षणिक विकासात भर घातली.

अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड मधील नवउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी दोन महिन्याचा मोफत उदयोजकता विकास कार्यक्रम राबविला. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मन, आणि संस्कृत भाषेचे मोफत शिक्षण दिले जाते. तसेच, सिकलसेल अँनेमिया पेशंट शोधण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे.

राजकीय प्रवासात, अमित गोरखे यांनी 2012 मध्ये भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून भारतीय जनता पक्षात प्रदेश सदस्य ते प्रदेश सचिव असा प्रवास केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यांची विधानपरिषदेसाठी सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर, ते मातंग समाजाच्या इतिहासातील विधान परिषदेवर जाणारे पहिले युवा आमदार ठरले आहेत.

अविचलित श्रम आणि महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर अमित गोरखे यांनी यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून अनेकांना शिकण्यासारखे आहे.

बॅचलर नसतांना एलएलबी ची डिग्री घेतली! बार कौन्सिल ने वकिलीचे नामांकन नाकारले: हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने बरोबर ठरवले!

महार-मांग भेदनीतितील वास्तव

Leave a comment