मेजर सीता शेळके यांचं नाव आता संपूर्ण देशात गाजतंय, विशेषत: केरळच्या वायनाड जिल्ह्यात, जिथं त्यांच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या पथकानं अवघ्या 31 तासांत एक बेली ब्रिज उभारला. या पुलामुळे बचावकार्याला गती मिळाली आणि अनेकांचे जीव वाचले. पण या घटनेची पार्श्वभूमी, मेजर शेळकेंची कारकीर्द, आणि त्यांच्या कार्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया.
वायनाडची दुर्घटना
30 जुलैच्या रात्री केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून अनेक घरं उद्ध्वस्त झाली. यात 305 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि 250 हून अधिक लोक बेपत्ता झाले. निसर्गाच्या या कोपामुळे चुराल्लमाला, मुंदाक्काई, आणि मेप्पडी हे गावं पूर्णतः धोक्यात आले. अशा परिस्थितीत मदतीसाठी लागणारा एकमेव मार्ग असलेला पूल वाहून गेला, ज्यामुळे बचावकार्यात अडथळा आला.
लष्कराच्या मद्रास सॅपर्सचा योगदान
आपत्तीच्या वेळी, मद्रास सॅपर्स, जे लष्करी अभियंता युनिट आहे, हे संकट निवारण आणि पूल बांधणीत प्रवीण आहे. 2018 साली केरळमध्ये आलेल्या पुरातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. यावेळीही त्यांच्या पथकाने 19 स्टील पॅनेल वापरून बेली ब्रिज उभारला. हे कार्य 31 जुलैच्या रात्री सुरू होऊन 1 ऑगस्टला संध्याकाळी पूर्ण करण्यात आलं.
साहसाचं संपूर्ण देशभरातून कौतुक
मेजर शेळके यांच्या या साहसाचं संपूर्ण देशभरातून कौतुक झालं. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक करत त्यांना ‘वायनाडची वंडर वुमन’ असं म्हटलं. मेजर शेळकेंच्या पुलावर उभं राहून काढलेल्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
मेजर शेळके यांच्या कामगिरीबद्दल समाजमाध्यमांवर भरपूर कौतुक होत आहे. आसाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं.
काँग्रेसचे आमदार रमेश चेन्निथला यांनीही त्यांच्या धाडसी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. स्थानिक माध्यमांनी त्यांना ‘वाघीण’ अशी उपाधी दिली आहे.
मेजर सीता शेळके : मराठी मुलीचा अभिमान
मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या असलेल्या मे. सीता शेळके यांचं लष्करातील योगदान मोठं आहे. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलेल्या सीता शेळके, बेंगळुरूमधील मद्रास अभियांत्रिकी गटातील एकमेव महिला अधिकारी आहेत. त्यांचं नेतृत्व, धाडस, आणि निर्णयक्षमता यामुळेच बेली ब्रिजचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं.
सीता शेळके यांचं मूळगाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गाडीलगाव आहे, सध्या त्यांचे आईवडील टाकळी ढोकेश्वर या गावात राहतात, सीता यांचे वडील अशोक शेळके हे तालुक्यातील नामवंत वकील आहेत, सीता या 3 बहिणी आहेत.
अहमदनगर चे आमदार मा. संग्राम जगताप यांनी देखील X च्या माध्यमातून ट्विट करून मेजर सीता शेळके यांच्या कार्यास सलाम केला आहे.
मेजर सीता शेळके यांचं कार्य भारतातील महिला अधिकारी कशा प्रकारे संकटाच्या वेळी नेतृत्व करू शकतात याचं उदाहरण आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील मद्रास सॅपर्सच्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आणि त्यांनी संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असं कार्य केलं आहे. त्यांच्या या कार्याचा आदर आणि गौरव करण्याची वेळ आपल्यावर आली आहे.